नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्याने दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र या दोन विषयाच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जाणार आहेत. पेपर फुटल्यानंतर सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. पेपर लिक करणाऱ्यांनी 10 व्या गणिताच्या आणि 12वीच्या अर्थशास्त्र विषयाची हाताने उत्तर लिहिलेली उत्तरपत्रिका आधीच सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविली होती.
12 वीच्या अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका सोमवारी संध्याकाळी सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविली. तर 10 वीच्या गणित विषयाची हाताने लिहिलेली उत्तरपत्रिका मंगळवारी सीबीएसईच्या चेअरमॅनकडे पाठविली होती. त्यामुळे आता या पेपरफुटी प्रकरणावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीबीएसईच्या दोन्ही इयत्तांच्या प्रश्नपत्रिका जर आधी सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविण्यात आल्या होत्या तरीही परीक्षा का घेतली गेली? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. 12 वीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा 27 मार्च आणि 10वीच्या गणित विषयाची परीक्षा 28 मार्चला झाली.
सीबीएसईने दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, अज्ञात व्यक्तीकडून 26 तारखेला संध्याकाळी सहा वाजता 4 पानांची हाताने लिहिलेली उत्तरपत्रिका मिळाली. ही उत्तरपत्रिका एका लिफाफ्यात सीबीएसई अकॅडमिक यूनिटकडे पाठविण्यात आली होती. तसंच 23 मार्च रोजी एक फॅक्स आला होता. 23 तारखेला संध्याकाळी चार वाजता आलेल्या फॅक्समध्ये पेपर फुटी प्रकरणात एका कोचिंगचे संचालक आणि दोन शाळांचा सहभाग असल्याची माहिती देण्यात आली होती. सीबीएसईने सांगितलं की, या तक्रारी 24 मार्च रोजी रिजनल ऑफिसमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनाही याबद्दलची माहिती देण्यात आली होती.