नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमि बोर्डाच्या (सीबीएसई) परीक्षांची तारीख आता सोमवारी जाहीर होणार आहे. मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांख यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक आज सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होते. मात्र, परीक्षांच्या वेळापत्रकाला अंतिमत: निश्चित करण्यासाठी काही तांत्रिक बाबींची खात्री करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळापत्रक घोषित करण्याची तारीख बदलल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली.
केंद्रीय विद्यालयाच्या या परीक्षा कोरोना लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणजेच, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. कारण, जेईई परीक्षा १८ जुलैपासून सुरु होत असून नीट २०२० परीक्षेचं नियोजन २६ जुलै २०२० रोजी करण्यात आलं आहे.
दरम्यान, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेलं वेळापत्रक हे खोटं असून विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक या ट्विटर हँडलवरुन व्हायरल झालेलं वेळापत्रक खोटं असल्याचं सांगण्यात आलं आहे.