नवी दिल्ली - यावेळी बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमा प्रमाणेच पार पडतील. तसेच, परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल, असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या पीरक्षांसदर्भात संभ्रमाची स्थिती होती. कारण सीबीएसईने अद्याप परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नव्हते. मात्र, आता अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनंतर, या परीक्षांसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे.
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सीबीएसईचे आधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in. वर पाहता येऊ शकतो. याच बरोबर सीबीएसई बोर्ड परीक्षांसंदर्भात पसरत असलेल्या अफवांनाही आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण महामारी आणि इतर बदल झाले असले तरीही सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमा प्रमाणेच आयोजित केल्या जातील, हे निश्चित करण्यात आले आहे.
एएसएसओसीएचएएमने नॅशनल एज्यूकेशन पॉलिसीवर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबिनारमध्ये बोलताना सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, परीक्षा निश्चितपणे होणार आणि याचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होईल. मात्र, परीक्षा कशा प्रकारे आयोजित केली जावी? यावर सीबीएसई विचार करत आहे, असेही त्रिपाठी यांनी सांगितले.
ही परीक्षा कशा फॉरमॅटमध्ये होईल? यासंदर्भात मात्र, त्यांनी माहिती दिली नाही. मार्च-एप्रिल महिन्यात, वर्ग कशा प्रकारे चालवले जातील, यावरून सर्वच चिंतित होते. मात्र, शिक्षकांनी आणि शाळांनी परिस्थिती तसेच आवश्यकतेनुसार कार्य केले. त्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून काही महिन्यांतच ऑनलाईन वर्ग सुरू केले. यासाठी त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यांपासून फिजिकल क्लासेस बंद आहेत. एवढेच नाही, तर बोर्डाच्या परीक्षांतही अनेक प्रकारचे बदल करावे लागले आहेत. सुरुवातीला परीक्षा स्थगित करण्यात आल्या. यानंतर काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. यामुळे यावेळच्या परीक्षांसंदर्भातही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. मात्र त्यांच्या या शंकांना आता पूर्णविराम मिळाला आहे.