नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी दिलासा दिला आहे. दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेणार नाही, असा निर्णय सीबीएसई घेतला आहे. सीबीएसईच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा झालीच तर ती फक्त दिल्ली व हरियाणा या दोनच राज्यांमध्ये घेतली जाईल, असं समोर आलं होतं. त्यामुळे बोर्डाच्या या निर्णयाचा फायदा दिल्ली एनसीआर आणि हरियाणाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. याच दोन ठिकाणांहून पेपर फुटल्याची चर्चा आहे. पेपरफुटीचा गणिताच्या परीक्षेवर फारसा परिणामा झाला नसल्याचं चौकशीतून समोर आल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. 28 मार्च रोजी दहावी सीबीएसईचा गणिताचा पेपर झाला होता.
सीबीएसईच्या दहावीचा गणिताचा पेपर तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला. या दोन्ही पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका होताच सीबीएसईने फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, 25 एप्रिल रोजी बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या या अर्थशास्त्राच्या पेपरफुटी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी तीन जणांना अटक केली. यामध्ये खासगी शाळेतील दोन शिक्षकांचा समावेश आहे.