नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) इयत्ता बारावीचे निकाल शनिवारी जाहीर झाले असून दिल्लीच्या सुकृती गुप्ता हिने ९९.४ टक्के गुणांसह देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. अशोक विहारमधील मॉन्टफोर्ट शाळेची विद्यार्थिनी असलेल्या सुकृतीला ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत.
हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधील टागोर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी पलक गोयल हिने ४९६ गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तर हरियाणाच्या करनालमधील सेंट थेरेसा कॉन्व्हेंट स्कूलची सोमी उप्पल आणि चेन्नईच्या पीएसबीबी सिनिअर सेकंडरी स्कूलचा अजिश शेखर या दोघांनी ४९५ गुण मिळवून तिसरे स्थान पटकाविले आहे. या परीक्षेत सुकृती गुप्ताप्रमाणेच मुलींनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88.58% आहे. तर परीक्षेतील एकूण मुलांपैकी ७८.८५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. क्षेत्राचा विचार केल्यास दक्षिण भारताचा निकाल सर्वोत्कृष्ट आहे. तिरुवअनंतपुरम क्षेत्रात 97.61% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ चेन्नईचा क्रमांक लागतो. तेथे ९२.६३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण सरासरी 83.05% राहिले असून गेल्या वर्षीच्या ८२ टक्क्यांच्या तुलनेत ही सुधारणा आहे.