नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE)च्या पेपरफुटीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन शिक्षक आणि कोचिंग क्लासमध्ये शिकवणा-या एका तरुणाला बोड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ऋषभ आणि रोहित शिक्षकांना अटक केली आहे. तर तौकिर हा कोचिंग क्लासमध्ये मुलांना शिकवायचा. पेपरफुटी प्रकरणात या तिघांचा हात असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
पेपरफुटीप्रकरणी क्राइम ब्रँचनं आता कारवाईला सुरुवात केलीय. तीन शाळांचे मुख्याध्यापक आणि 6 शिक्षकांची शनिवारी क्राइम ब्रँचनं चौकशी केली. या सर्व शिक्षकांवर प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर लीक केल्याचा आरोप आहे. बवाना शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांची पोलिसांनी रात्री उशिरा चौकशी केली. या सर्व शिक्षकांनी 12वीचा अर्थशास्त्राचा पेपर परीक्षेच्या 75 मिनिटं आधी विद्यार्थ्यांसाठी खुला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 12वीच्या अर्थशास्त्राचा पेपर 26 एप्रिल रोजी झाला होता.
तसेच सोनिपतमधल्या CBSEच्या एका कर्मचा-याचीही या प्रकरणात चौकशी सुरू आहे. या कर्मचा-याजवळ प्रश्नपत्रिकेचे दोन सेट होते. विशेष म्हणजे लीक झालेल्या पेपरचा विभाग कोड आणि त्या कर्मचा-याजवळ असलेल्या पेपरचा कोड समान आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी CBSE प्रमुखांना पाठवलेल्या ईमेलची गुगलकडून माहिती मागवली आहे.
10वीच्या एका विद्यार्थ्यानं स्वतःच्या वडिलांच्या इमेल आयडीवरून CBSE प्रमुखांना व्हॉट्सअॅपवर लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची स्कॅन कॉपी पाठवली होती. या मुलाच्या वडिलांच्याही पोलीस संपर्कात आहे. वडील देव पोलीस चौकशीत सहकार्य करण्यास तयार झाले आहेत. CBSE अधिका-यांच्या चौकशीनंतर क्राइम ब्रँचला यात दिल्लीतल्या एका शाळेचा हात असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.
काय आहे सीबीएसई पेपरफुटी प्रकरण?
दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले.