नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वी १२ वीच्या एकूण ज्या ४१ विषयांच्या परीक्षा ‘लॉकडाऊन’मुळे घेता आलेल्या नाहीत, त्यापैकी २९ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा शक्य होईल तेवढ्या लवकर घेतल्या जातील व पेपर तपासून निकाल जाहीर करण्याचे कामही त्यानंतर सुरू केले जाईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी बुधवारी सांगितले.पहिले ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतरही सीबीएसई’ने १ एप्रिल रोजी असेच टष्ट्वीट केले होते; परंतु त्यानंतर महिना उलटला व ‘लॉकडाऊन’ संपण्याऐवजी ते वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने राहिलेल्या विषयांच्या परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होऊ लागली.त्या पार्श्वभूमीवर माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, ज्या विषयांच्या परीक्षा राहिल्या आहेत ते पुढील इयत्तेसाठी व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संबंधित विषयाची तयारी पक्की व्हावी व विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता निकालात प्रतिबिंबित व्हावी यासाठी त्या विषयांची परीक्षा घेण्याचे टाळणे योग्य होणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख किमान तीन दिवस आधी कळविली जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची व्हिडिओ बैठक घेतली त्यातही यावर चर्चा झाली. झालेल्या ‘सीबीएसई’ परीक्षांचे पेपर तपासण्याचे काम सुरूकेले जाईल व ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर १० दिवसांत राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील, असे मंत्र्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्यांनीही आपापल्या शिक्षण मंडळांच्या परीक्षांची पेपर तपासणी पेपर तपासणीसांच्या घरी पाठवून सुरूकरावी, असेही सुचविण्यात आले.—————————
‘सीबीएसई’ राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 5:17 AM