नवी दिल्ली - सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षांची तारीख घोषित केली आहे. या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलैदरम्यान पार पडतील. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. या परीक्षांच्या तारखेसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या होत्या. यावेळी सीबीएसईने, परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात येतील, असेही सांगितले होते.
आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका
सीबीएसईने एप्रिल महिन्यात एक नोटिफिकेशन जारी करत म्हटले होते, की एकूण 29 विषयांची परीक्षा घेतली जाईल. हे सर्व विषय, असे असतील ज्यांची उच्च शिक्षाणाच्या प्रवेशासाठी आवश्यकता असते.
आणखी वाचा - बोरिस जॉन्सन यांनी दुसऱ्या पत्नीपासून घेतला घटस्फोट, कोट्यवधी रुपये देण्यावर झाली सहमती
तत्पूर्वी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वी १२ वीच्या एकूण ज्या ४१ विषयांच्या परीक्षा ‘लॉकडाऊन’मुळे घेता आल्या नाहीत, त्यापैकी २९ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा शक्य तेवढ्या लवकर घेतल्या जातील व पेपर तपासून निकाल जाहीर करण्याचे कामही सुरू केले जाईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले होते.
यानंतर लॉकडाऊन वाढत असल्याने, राहिलेल्या विषयांच्या परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होऊ लागली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर माहिती देताना सूत्रांनी म्हटले होते, की ज्या विषयांच्या परीक्षा राहिल्या आहेत ते पुढील इयत्तेसाठी व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संबंधित विषयाची तयारी पक्की व्हावी व विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता निकालात प्रतिबिंबित व्हावी यासाठी त्या विषयांची परीक्षा घेण्याचे टाळणे योग्य होणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख किमान तीन दिवस आधी कळविली जाईल.
यापूर्वी करण्यात आली आहे JEE अॅडव्हांस परीक्षेची घोषणा -यापूर्वी गुरूवारी पोखरियाल यांनी, लॉकडाउनमुळे स्थगित झालेल्या जेईई अॅडव्हांस परीक्षेचीही घोषणा केली होती. 23 अॉगस्ट, 2020 रोजी ही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.