नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सीबीएसई मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मंडळाने आता या विद्यार्थ्यांसाठी गुणवाटपाची पद्धत जाहीर केली आहे. गुणवाटपाची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल २० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शाळांना नेहमीप्रमाणे प्रत्येक विषयासाठी २० गुण इंटरनल असेसमेंटच्या स्वरूपात द्यायचे आहेत. तर ८० गुणांचे वाटप हे वर्षभरात शाळेने घेतलेल्या विविध चाचणी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे द्यायचे आहेत.
यापूर्वी दहावीच्या परीक्षेत शाळेच्या कामगिरीचे भान ठेवून गुणवाटप करायची काळजी शाळांनी घ्यायची आहे, असे मंडळाने सांगितले आहे. यासाठी शाळांनी मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यीय समिती स्थापन करण्याची सूचनाही मंडळाने केली आहे. शाळेने गुणवाटप करताना अन्यायकारक व पक्षपाती भूमिका घेऊ नये; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने बजावले आहे. काेरोनामुळे आयसीएसई, सीबीएसईसह अनेक राज्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. इयत्ता बारावीसह सीए व इतर स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.