मंगळुरु - 'सीसीडी'चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह 36 तासांनंतर सापडला, मंगळुरु येथील नेत्रावती नदीत त्यांचा मृतदेह सापडला, व्ही. जी सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई आणि प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी (29 जुलै) आपल्या कारने प्रवास करत होते. दरम्यान मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर 36 तासांनंतर त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.
सोमवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा फोनही स्विच ऑफ असल्याची माहिती मिळत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजण्याच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला लगेचच येतो असं सांगितलं. ड्रायव्हरने ही अर्धा तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परत आलेच नाहीत. तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनदेखील बंद आहे. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली. सिद्धार्थ हे बेपत्ता होण्याआधी काही वेळ त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या सोबत असल्याने पोलीस ड्रायव्हरची चौकशी करत होते. तसेच व्ही. जी. सिद्धार्थ यांचे कॉल डीटेल्सही तपासण्यात येत आहेत.
व्ही.जी सिद्धार्थ हे उद्योगातील अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहिलेल्या पत्रात मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी ठरलो असं सांगितले. सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना पत्र लिहीलं होतं. एएनआय या वृत्तसंस्थेने हे पत्र पोस्ट केलं आहे. या पत्रावरुनच सिद्धार्थ हे नैराश्याने ग्रासले असल्याचं समोर आलं होतं.