वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले असून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी नादुरुस्त झालेले सीसीटीव्ही कॅमेरे आज बदलले. या परिसरात गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा वचक नसल्यामुळे दरोडे, चोरीच्या घटनांचा आलेख उंचावत चालला आहे. २३ जून रोजी पंढरपुरात दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण करून एकाच रात्री ६ दुकाने फोडली होती. यानंतर २६ जूनला पंढरपूरच्या भाजी मंडईत शेख निसार या युवकावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले होते. या दोन्ही घटना औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्यावरच घडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, तसेच गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी पंढरपुरातील तिरंगा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते; मात्र या कॅमेऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्यामुळे सहा महिन्यांपासून हे कॅमेरे बंद पडले आहेत. या कॅमेऱ्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिले असते, तर तिरंगा चौकातील गंभीर घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
पंढरपूर तिरंगा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू
By admin | Published: September 03, 2014 12:13 AM