नवी दिल्ली : कोविड-१९ च्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारींमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रुग्णालयांतील वॉर्डांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लवकरच ही यंत्रणा उभारण्यात येत आहे.
दिल्लीत रुग्णांवर योग्य उपचार होत नाही, अशा तक्रारीत वाढ झाली आहे. ज्या रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरु आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या घेतलेल्या केजरीवाल यांच्या निर्णयास नायब राज्यपालांनीही मान्यता दिली. कोविड- १९ चे उपचार करणाऱ्या रुग्णालयांत कॅमेरे बसवताना तिथे एक नियंत्रण कक्षही असेल. कुठे काय चालले यावर त्या कक्षातून लक्ष ठेवले जाईल. शिवाय केंद्र सरकारच्या सूचनेनुसार तातडीने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले जाईल. रुग्णाची तब्येत कशी आहे याची माहितीही कुटुंबीयांनाकक्षातून मिळेल.
केजरीवाल म्हणाले, दिल्लीत रोज २० हजार तपासण्या होत आहेत. सरकारी रुग्णालयांतील चार हजार बेड्सवर आॅक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व खासगी रुग्णालयांतील १३५०० बेड या रुग्णांसाठी राखीव आहेत. त्यातील ७५०० बेड रिक्त आहेत. काही हॉटेल्सही खासगी रुग्णालयांना जोडली असून, तिथे बेडची संख्या ३५०० हजार आहे. दिल्लीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर नुकतीच प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती.