नवी दिल्ली -मुंबईकरांची एसी लोकलची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. नव्या वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फे-या सुरु होतील. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. उपनगरीय लोकलसेवेला मुंबईकरांची लाईफलाईन म्हटले जाते. दिवसेंदिवस उपनगरीय लोकलसेवेवरील ताण वाढत असून, दरदिवशी 65 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. एकटया पश्चिम रेल्वेमार्गावर 35 लाख प्रवासी आहेत.
मागच्यावर्षभरापासून एसी लोकलची चर्चा सुरु आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर एसी लोकलच्या दिवसाला सात फे-या होतील. एसी लोकलच्या विविध चाचण्या झाल्या असून, 1 जानेवारीपासून एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असे गोयल यांनी सांगितले.
एसी लोकलच्या तिकीटाचे दर दिल्ली मेट्रो किंवा फर्स्ट क्लासच्या तिकीटापेक्षा दीडपट जास्त असतील असे अधिका-यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वे मार्गावरही एसी लोकल लवकरच सुरु होईल.
- प्रवाशी सुरक्षेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी जनरल मॅनेजर्सना सर्व अधिकार देण्यात आले आहेत.
- मुंबईत रेल्वे सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येईल हे सीसीटीव्ही स्थानिक पोलीस स्थानकांशी जोडले जातील.
- आधी एका डिविजनमध्ये एका एडीआरआम असायचा. हेच चांगल्या पद्धतीने कामकाज चालावे यासाठी दोन एडीआरएम असतील.
- देशभरात 3 हजार रेल्वे स्टेशनन्सची स्वयंचलित जीने बसवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. याचा दिव्यांग, वुद्ध व्यक्तींना फायदा होईल.
- प्रवासी संख्येच्या आधारावर रेल्वे स्टेशन्सची निवड करुन त्यानुसार रेल्वे स्टेशन्सवर सुविधा वाढवण्यात येतील.
- रेल्वेकडे निधीची खासकरुन प्रवासी सुरक्षेसाठी निधीची अजिबात कमतरता नाही असे पियुष गोयल यांनी सांगितले.
- प्रवासी सुरक्षेला सरकारचे पहिले प्राधान्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रवासी सुरक्षेसाठी निधी वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला दिले आहे.