नवी दिल्ली- भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवरील संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी भारतीय रेल्वेने एक नवे पाऊल उचलले आहे. सीसीटीव्ही बसविण्यासाठी रेल्वे आता 2500 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. देशभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यावर आता सीसीटीव्हीची नजर असेल.केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून निधी न मिळाल्यामुळे रेल्वे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे आयआरएफसीकडून हे पैसे उभे करणार आहे. आयआरएफसी शेअर बाजार तसेच इतर पर्यायी मार्गांचा वापर करुन भांडवल उपलब्ध करुन देत असते.निर्भया फंडाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने 500 कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्हीसाठी देऊ केला. मात्र सीसीटीव्ही प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी 3000 कोटी रुपयांची रेल्वेला गरज आहे असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
निर्भया निधीमधून या वर्षी 436 स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात येतील तर पुढील वर्षी 547 स्थानकांवर सीसीटीव्ही लागतील. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये 5,121 रेल्वे स्थानकांवर आणि 58 हजार 276 रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूरी मिळाली. येत्या दोन वर्षांमध्ये मेल, एक्स्प्रेस, लोकल व इतर रेल्वे सेवा सीसीटीव्ही निगराणीखाली येतील असे सांगण्यात येते.