मनी लाँड्रिंग प्रकरणात काही महिन्यांपासून तिहार जेलमध्ये असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिहार जेलमध्ये असलेल्या सत्येंद्र जैन यांना जेलमध्येच आरामात मसाज मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये गुन्हेगारांसाठी मसाज पार्लर उघडल्याचं भाजपाने म्हटलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन जेलमध्येच मसाजचा आनंद घेत आहेत. त्याच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, जे त्याची सेवा करतानाही दिसतात. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजचा हा व्हिडीओ आहे, जो सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सप्टेंबर महिन्यातील असल्याचे जेलमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
सत्येंद्र जैन व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. जैन यांना जेलमध्ये व्हीव्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. जैन यांना जेलमध्ये पिण्यासाठी मिनरल वॉटर मिळते, असे भाजपाचे हरीश खुराणा यांचे म्हणणे आहे, याचे पुरावेही दिसत आहेत. जैन यांना भेटण्यासाठीही अनेकजण येतात. दुसरीकडे, तिहार जेलच्या सूत्रांनुसार, हा व्हिडिओ तिहार प्रशासनाच्या निदर्शनास आला होता, ज्यावरून संबंधित अधिकारी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे शहजाद पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांना मंत्रीपदावर ठेवलं आहे. सत्येंद्र जैन यांना पाच महिन्यांपासून जामीन मिळालेला नाही. जामीन वारंवार फेटाळण्यात आला आहे. केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी सुविधा मिळाव्यात, त्यांना मसाज मिळावा, आरामात जगता यावे यासाठी त्यांना मंत्री का केलं हे आज समजल्याचं देखील म्हटलं आहे. जणू काही अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये अशा गुन्हेगारांसाठी मसाज पार्लर उघडल्याचंही सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"