मुंबई: लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत प्रवास करत होते. हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. या घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत.
सीडीएस बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये ९ जण होते. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत त्यांच्यासोबत होत्या. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची आणि तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पीटीआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हिआयपी या विमानातून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते.