नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या विमानात भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 9 जण होते. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. दरम्यान, या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, Mi-17V5 हेलिकॉप्टरमधील सर्व जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. सीडीएस रावत हे वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. जनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ कॉलेज वेलिंग्टनमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचे दुपारी 2.45 वाजता व्याख्यान होते. ते दिल्लीहून सुलूर फिक्स्ड विंगमध्ये गेले. सुलूर ते वेलिंग्टन हे अंतर 53 किलोमीटर होते. त्याचवेळी कुन्नूर ते वेलिंग्टन हे अंतर केवळ तीन किलोमीटर होते आणि हेलिकॉप्टर लँडिंगपूर्वीच कोसळले.