नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैनदल प्रमुखही यावेळी उपस्थित होते. जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या पार्थिवांना एकाच चितेवर अखेरचा निरोप देण्यात आला. रावत यांच्या मुली कीर्तिका आणि तारिणी यांनी आई-वडिलांना मुखाग्नी दिला.
जनरल रावत यांची अखेरची यात्रा अत्यंत भावनिक होती. संपूर्ण मार्गावर फुलांचा वर्षाव केला होता आणि हाती तिरंगा घेऊन जनरल बिपिन रावत अमर रहेच्या घोषणाही दिल्या जात होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी आर्मी कँट भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी भारताचे तिन्ही लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यापूर्वी कधीही एखाद्या लष्करी अधिकाऱ्याच्या अंतिम दर्शनासाठी एवढी गर्दी जमली नव्हती. उपस्थितांनी पानावलेल्या डोळ्यांनी आपल्या हिरोला अखेरचा निरोप दिला.
अंत्ययात्रेला जनसागर उसळला
जनरल बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला दिल्लीत जनसागर उसळला होता. आपल्या वीर योद्ध्याच्या सन्मानार्थ ‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ च्या घोषणा दिल्या होत्या. बिपीन रावत यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या वाहनाच्या सोबत शेकडो लोक हातात तिरंगा घेऊन घोषणा देत होते. दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत जनरल रावत यांच्यावर अंत्यविधी पार पडले. त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिल्यावर उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
चार देशाचे उच्च अधिकारी उपस्थितसीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक तर जमले होते. शिवाय, श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला.