नवी दिल्ली: मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना दिशा देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन हे लवकरच सरकारी सेवेतून मुक्त होणार आहेत. सुब्रमण्यन यांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. मात्र, त्यानंतर मुदतवाढ न घेता सुब्रमणियन अमेरिकेला परतरणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. यापूर्वी मोदी सरकारने सुब्रमण्यन यांचा कार्यकाळ वाढवला होता. मात्र, सुब्रमण्यन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पुन्हा एकदा मुदतवाढ घेण्यास नकार दिला.अर्थमंत्री अरूण जेटली यांनी फेसबुक पोस्टवरून अरविंद सुब्रमणियन यांचे आभार मानले. अरविंद सुब्रमणियन यांनी त्यांच्या कार्यकाळातील चार आर्थिक सर्वेक्षणांच्यावेळी सामान्य जनतेच्यादृष्टीने मांडण्यात येणाऱ्या कल्पना आणि विवेचनाचा दर्जा नव्या उंचीवर नेऊन ठेवला. अनेक समीक्षकांनी त्यांच्या धोरणांचा सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवही केला. चार दिवसांपूर्वीच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मी अरविंद सुब्रमणियन यांना भेटलो. त्यावेळी सुब्रमणियन यांनी आपल्याला आता कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, असे मला सांगितले. त्यासाठी अमेरिकेत परतण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. त्यांची ही कारणे भले वैयक्तिक असतील पण त्यांच्यादृष्टीने खूपच महत्त्वाची आहेत. माझ्यासमोर सुब्रमणियन यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे जेटली यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या धोरणांना दिशा देणारा 'हा' वरिष्ठ अधिकारी पद सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 3:33 PM