ठळक मुद्देपाकिस्तानकडून गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारी) भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने राजौरा जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करत हवाई शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
Air Surgical Strike on Pakistan : हद्दीत घुसताच पाडलं, भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचं F16 विमान नेस्तनाबूतपाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यानंतर लेह, जम्मू काश्मीर, श्रीनगर, पठाणकोट आणि अमृतसर येथील विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंडीगड आणि श्रीनगर विमानतळ बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, भारतीय सैन्य आणि वायू सेना पाकिस्तानाला जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात येत आहे.
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.