श्रीनगर - संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबारी करण्यात येत आहे. या गोळीबारीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे बारामूला, सोपोर आणि बांदीपुरा या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
उत्तर काश्मीरच्या सोपोरमधील रफियाबाद याठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. सुरक्षा यंत्रणाचे या परिसरात शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला. या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी हानी झाली नसली तरी 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. अजूनही या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस या परिसराची छाननी करत आहे.
सोपोर या परिसरासोबत बारामूला, बांदीपुरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु आहे. बारामूलाचे पोलीस अधिक्षक अब्दुल कय्यूम यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळपासून या परिसरात सुरक्षा यंत्रणाकडून शोधमोहीम सुरु आहे. ही शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. बुधवारीही सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम राबवण्यात येत होती. मात्र खराब वातावरणामुळे बुधवारी ही मोहीम थांबविण्यात आली.
दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत अद्याप एकही दहशतवादी ठार झाला नाही. मात्र पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारात 24 वर्षीय भारतीय जवान यशपाल हा शहीद झाला आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. या हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. याच बदला म्हणून भारताने एअर स्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते.