CEC Rajiv Kumar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जिल्हादंडाधिकारी/ रिटर्निंग ऑफिसर यांना फोन करुन धमकावल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. गृहमंत्री अमित शाह हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने जयराम रमेश याच्या आरोपांची दखल घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयागोना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीच्या आधी १५० जिल्हादंडाधिकाऱ्यांना फोन करुन धमकावले होते, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. जयराम रमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टद्वारे हे आरोप केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत जयराम रमेश यांच्याकडे त्यांच्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला होता. आयोगाने जयराम रमेश यांच्याकडून रविवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सगळ्याबाबत भाष्य केलं आहे.
"हे कसे होऊ शकते?... कोणीही त्यांना (जिल्हादंडाधिकारी/रिटर्निंग ऑफिसर ) फोन करू शकेल का? हे कोणी केले ते सांगा, आम्ही त्याला शिक्षा देऊ... तुम्ही अफवा पसरवून सर्वांना संशयाच्या भोवऱ्यात आणता हे योग्य नाही," असं प्रत्युत्तर राजीव कुमार यांनी जयराम रमेश यांना दिलं आहे.
जयराम रमेश नेमकं काय म्हणाले?
"गृहमंत्री आज सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत १५० अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. ४ जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता संविधानाचे रक्षण करावे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.