यूपीएससी टॉपर आयएएस टीना डाबी दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. खुद्द टीना डाबीनं याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी टीना डाबी लग्न करणार आहे. टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 'तू दिलेलं हास्य परिधान करतेय', अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
प्रदीप गावंडे यांचादेखील हा दुसरा विवाह असेल. त्यांनी चुरु जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम केलं आहे. आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप आणि टीना यांचा विवाह सोहळा २२ एप्रिलला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये संपन्न होईल.
राजस्थान कॅडरच्या २०१६ च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं २०१८ मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. २०२० मध्ये दोघे वेगळे झाले. अतहर २०१६ मध्ये झालेल्या यूपीएससी परिक्षेत देशात दुसरा आला होता. मसुरीमध्ये आयएएसच्या प्रशिक्षणादरम्यान टीना आणि अतहर यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी होते. तलाक घेतल्यानंतर अतहर जम्मू काश्मीरला परत गेला.
निकाहानंतर टीनानं तिच्या नावापुढे खान आडनाव लावलं. तलाकसाठी अर्ज करण्यापूर्वी तिनं सोशल मीडिया अकाऊंटवरून खान आडनाव काढलं. त्यानंतर अतहरनं टीनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. टीनाचे वडील जसवंत डाबी आणि आई हिमानी इंजिनीयर आहेत. टीनाचं कुटुंब जयपूरचं आहे. मात्र तिचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. टीना सातवीत असताना तिचं संपूर्ण कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं.