नवी दिल्ली : देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्तात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण आणि पथसंचलन पार पडले. निमलष्कर दलांसह विविध सुरक्षा दलांचा कार्यक्रमांमध्ये सहभाग होता.राज्य पातळीवरील ध्वजारोहणानंतर त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिक मुद्यांना भाषणांमध्ये प्राधान्य देतानाच विशेषत: सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधले. कलम ३७१ (एच) नुसार अरुणाचल प्रदेशला देण्यात आलेल्या सुविधा कायम राहतील, असे आश्वासन केंद्र सरकारने संसदेत दिल्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी इटानगर येथील इंदिरा गांधी पार्कमध्ये ध्वजारोहणानंतर भाषणात नमूद केले. सिक्किमला ३७१ (एफ) नुसार विशेष दर्जा देण्यात आला असून तो कायम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी म्हटले. मिझोराम आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी प्रगती आणि विकासाकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राष्टÑीय नागरिक नोंदणीसंबंधी भूमिकेचे समर्थन करतानाच भूमिहीन कुटुंबांना जमिनीचा अधिकार बहाल करण्यासाठी लवकरच नवे धोरण आणणार असल्याचे सांगितले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी फोन करून सरकारबाबत मते जाणून घेणार असल्याची माहिती दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘न्याय के साथ विकास’ आणि सांप्रदायिक सौहार्दाचा नारा दिला.ईशान्येकडील राज्यांमध्ये अनुचित घटना नाही...ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यांमुळे विशेषत: या राज्यांमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते.
देशभरात शांततेत स्वातंत्र्यदिन साजरा, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिला विकासाचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 6:05 AM