- मुकेश माचकरप्रसंग पहिला
अरेच्चा, इथे रोषणाई कशी, आनंदोत्साह कसा, एवढा सपाटून मार खाल्ल्यानंतर हे साजरं तरी काय करतायत, असा प्रश्न आम्हाला पडला त्या आलिशान पक्ष कार्यालयात शिरताना. वाटेतच कोणीतरी मिठाई भरवली. आम्ही एका मस्तवाल दिसणाऱ्या माणसाला नमस्कार केला. हा या पक्षाचा नेता असणार, हा अंदाज बरोबर ठरला. त्याने विचारलं, ‘आप प्रेस से हो? पूछो भई जो पूछना है पूछो…’
आम्ही विचारलं, ‘तुम्ही पक्ष कार्यालय विकलं तर नाही ना…?’
तो म्हणाला, ‘भई हम क्यूँ बेचेंगे? करोडो का खर्चा करके इसे बनाया है तो क्या बेचनेके लिए? इसको बनाने के लिए हमने कहाँ कहाँ क्या क्या बेचा है वो तो आपको भी मालूम होगा… वैसे आपको ये शक क्यूँ हुआ?’
आम्ही म्हणालो, ‘तुमचा एवढा प्रचंड पराभव झालेला आहे. तरी तुमच्याकडे विजयाचं वातावरण आहे. म्हणून शंका आली.’
तो अतिशय आश्चर्यचकित चेहऱ्याने म्हणाला, ‘हार? आमची हार झाली? आमचा तर चांगला दणदणीत विजय झालाय.’
आम्ही म्हणालो, ‘हे अर्णबला सांगा. त्याच्या चॅनेलवर तो म्हणतही होता, व्हाॅट इज सिक्स्टी टू? सिक्स अँड टू. दोन्ही मिळून किती झाले. आठ. दोन्हीकडे आठ जागा. त्यात इकडच्या बाजूला जाज्वल्य देशभक्ती आहे, त्यामुळे विजय कुणाचा झाला, इकडचाच. तसंच तुमचंही मत आहे काय?’
तो नेता हसून म्हणाला, ‘अर्णब येडा आहे (त्यांनी वापरलेला शब्द येडा नसणार, वेगळा असणार, हे येडा नसलेल्या वाचकांना समजून गेलं असेलच). त्याच्याकडे कुठे लक्ष देता? आमचा हा दणदणीत विजय आहे, यात आम्हाला शंकाच नाही. तुम्ही सांगा, या निवडणुकीत मतांची टक्केवारी कुणाची वाढली? फक्त आमची. या निवडणुकीत जागा कुणाच्या वाढल्या? फक्त आमच्या. टक्के घटले कुणाचे? बाकीच्यांचे. जागा कमी कुणाच्या झाल्या? इतरांच्या.’
आम्ही समजुतीच्या सुरात म्हणालो, ‘तुम्ही हा दिलासा देऊन आपल्या मनाची समजूत काढताय, हे कळतंय मला. तुमची कामगिरी आधीपेक्षा सरस झाली, हेही खरं आहे. पण, पराभव हा पराभव असतो. कुठे ६२ आणि कुठे आठ.’
नेता आणखी एक लाडू भरवत म्हणाला, ‘तुमच्या लक्षात येत नाही मी काय म्हणतोय ते. या निवडणुकांमध्ये आमच्याकडे दिल्लीत काही सांगण्यासारखं होतं? काही नाही. आमच्याकडे देशभरातल्या कारभारात काही सांगण्यासारखं आहे? काहीही नाही. आम्ही दिल्लीतल्या विकासकामांमध्ये काही खोट काढू शकत होतो? काही नाही. म्हणजे यावेळी गेल्यावेळच्या तीन जागासुद्धा निवडून याव्यात, अशी आमची नसताना आम्ही यावेळी आठ जागा निवडून आणल्या, हे लक्षात येतंय का तुमच्या? तेही फक्त आणि फक्त विष उगाळून. ३८ आणि ५३ यांत फक्त १५ टक्क्यांचं अंतर आहे आणि आमच्याकडे पाच वर्षं आहेत, केंद्र सरकार आहे, दिल्ली पोलीस आहेत, बटीक राज्यपाल आहेत, विषाची तर फॅक्टरीही आहे आणि उत्तर प्रदेशात लॅबोरेटरीही आहे. आता सांगा, विजय कोणाचा झाला?’
आम्ही तोंडात अडलेला लाडू तसाच ठेवून निमूटपणे बाहेर पडलो.प्रसंग दुसरा
दुसऱ्या पक्षकार्यालयात मस्तवाल माणूस दिसणार नाही; दिसलाच तर तो बंदोबस्ताचा पोलिस असणार आणि सरकारी क्लार्कसारखा दिसणारा माणूस नेता असणार, ही आमची अटकळ बरोबर ठरली. आम्ही त्या साध्याशा माणसाला म्हणालो, ‘बधाई हो, तुमचा मोठा विजय झाला.’
‘थँक यू. पण यावेळी जबाबदारी वाढली आहे.’
आम्ही म्हणालो, ‘अर्थातच. तुम्हाला आता दिल्लीकरांच्या सुखसोयींसाठी आणखी झटावं लागेल. त्यांचा विकासावरचा विश्वास वाढवायला लागेल.’
नेता हसू लागला, म्हणाला, ‘दिल्लीवाले बहुत पँहुची हुई चीज हैं भाईसाब! आम्ही हा निकाल स्टँडअलोन पाहात नाही. लोकसभा-विधानसभा ताडून पाहतो. दिल्लीकरांनी आम्हाला फक्त दिवाबत्ती, वीजपाणी करायला नेमलेलं आहे. त्यांच्या मनातले देशाचे नेते वेगळेच आहेत, हे आम्हाला समजत नाही की काय!’
आम्ही चक्रावलो, ‘पण मग तुम्ही जबाबदारी वाढलीये म्हणालात ती…’
ते म्हणाले, ‘ती अशी वाढली आहे की यापुढेही केंद्र सरकार जेव्हा धार्मिक भेदभाव करणारे, एखाद्या राज्याचा धर्माच्या आधारावर संपूर्ण सत्यानाश करणारे निर्णय घेईल, तेव्हा आमच्यापैकी कोणीही त्या निर्णयांचा विरोध करणार नाही, हे पाहावं लागेल. लोकशाही हक्कांसाठी लोकशाही मार्गांनी जी काही आंदोलनं सुरू असतील, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्याकडून कोणीही तिथे फिरकणार नाही, हे पाहावं लागेल. आंदोलनांवर होणारे पोलिसांचे हल्ले, गुंडांचे गोळीबार यांचा आमच्यातला कोणी चकार शब्दाने निषेध करणार नाही, हे पाहावं लागेल. यातलं काहीही आम्ही केलं तर दिल्लीवाले हे दिवाबत्तीचं कामही आमच्याकडून काढून घेतील, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.’
आम्ही विचारात पडलो, मान हलवून म्हणालो, ‘मग तुम्ही सुरुवात कुठून करणार?’
नेते म्हणाले, ‘सध्या तरी सगळ्यांना हनुमान चालिसा पाठ करायला सांगितला आहे. तो झाला की रामचरितमानस घेणार आहोत.’ प्रसंग तिसरा
तिसऱ्या कार्यालयापाशी आल्यावर आम्ही बेशुद्ध पडायचेच बाकी राहिलो होतो. इथेही रोषणाई होती, इथेही पेढे वाटले जात होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता… इथे सगळ्यात सुस्त दिसणारा माणूस नेता असणार हा आमचा अंदाज खरा ठरला. आम्हीही शेजारी बैठकीवर बैठक मारून म्हणालो, ‘काय तुमच्या राजकुमारांचं लग्नबिग्न ठरलंय की राजकुमारींकडे पाळणा हलणार आहे?’
नेता म्हणाला, ‘नाही हो. तुम्हाला अशी शंका का आली?’
आम्ही म्हणालो, ‘तसं काही कारण नसेल तर तुम्ही पक्षकार्यालयाला रोषणाई करण्याचा खर्च करणार नाही हो. हाही कुठल्यातरी राज्याच्या प्रदेश कार्यालयाकडून करून घेतला असणार तुम्ही…’
नेता हसून म्हणाला, ‘असं नाही. निवडणुकीत यश मिळाल्यावरसुद्धा आम्ही रोषणाई करतोच.’
आम्ही म्हणालो, ‘यश मिळाल्यावर ना! या निवडणुकीत तुमचा विजय कुठे झालाय?’
नेता एकदम तत्त्वचिंतकाच्या आविर्भावात म्हणाला, ‘यश आणि विजय या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आम्ही विजय म्हणालो का, यश म्हणालो.’
आम्ही वैतागून म्हणालो, ‘अहो, पण तुम्हाला कसलं बोडक्याचं यश मिळालंय? ते तर दुसऱ्याच पक्षांना मिळालंय. अवघ्या दहा वर्षांच्या आत तुम्ही ४८ टक्के मतांवरून चार टक्क्यांवर घसरलाय. दिवे कसले लावताय?’
नेता म्हणाला, ‘पण देशहितासाठी जे हरणं आवश्यक होतं, ते हरले की नाही?’
आम्ही म्हणालो, ‘पण, त्यांना तुम्ही कुठे हरवलंत?’
नेता म्हणाला, ‘असं कसं? आमच्या पक्षाची मतं फोडण्याचीसुद्धा पात्रता नाही, हे आम्ही निष्क्रीयतेतून सिद्ध केलं नसतं, तर जे जिंकले त्यांना इतका एकतर्फी विजय मिळाला असता का? आम्ही सेक्युलर मतविभागणी टाळली म्हणूनच ते विजयी झाले, हे आमचंच यश नाही का?’
आम्ही इथला चिकट पेढा नुसता हातात घेतला, खाल्ला नाही. अनावश्यक खर्चविभागणी टाळण्यासाठी पेढेही आधीच्या दोन कार्यालयांतले उरलेले अर्ध्या भावाने आणलेले असणार, याची आम्हाला खात्री होती.