संयुक्त राष्ट्र : चारित्र्य हनन, स्वत:च्या आणि आपल्या दोन छोट्या जुळ्या मुलांच्या जीवाला धोका असतानाही समलैंगिक आणि बायसेक्युअल व्यक्तींच्या अधिकारांसाठीचा लढा चालूच ठेवण्याचा निर्धार माजी मिस इंडिया, अभिनेत्री सेलिना जेटलीने व्यक्त केला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्यालयात स्वातंत्र्य आणि समानता अभियानाच्या प्रचारार्थ त्या येथे आल्या होत्या. समलैंगिक व्यक्तींच्या समानतेचा या अभियानाकडून पाठपुरावा केला जातो. या लोकांविरुद्ध होणार्या हिंसात्मक भेदभावाचा विरोध केला जातो. सेलिनाने यानिमित्ताने ‘द वेलकम’ या युनोच्या माहितीपटात कामही केले आहे. अडीच मिनिटांच्या या माहितीपटात एका अशा तरुणाची कहाणी सांगण्यात आली आहे, जो प्रथमच आपल्या प्रिय व्यक्तीस (बॉयफ्रेंड) कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी घेऊन येतो. सेलिनाने या बॉलीवूड स्टाईलच्या माहितीपटाद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मानवी हक्क प्रमुख नवी पिल्ले यांनी जेटली यांची ‘यूएन समानता चॅम्पियन’ बनविण्यासाठी शिफारस केली होती. या नावीन्यपूर्ण माहितीपटास भारतातूनच नाही तर जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. समलैंगिक व्यक्तींच्या अधिकारांचे समर्थन केल्यामुळे स्वत:सह दोन जुळ्या मुलांनाही जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. मात्र, आपण यास येत्या काळातही भीक घालणार नसल्याचे जेटली म्हणाल्या.(वृत्तसंस्था)
> ‘भेदभावाविरुद्ध लढतेवेळी लोकांची समज आणि व्यवहारात कायदा व धोरणांमुळे काहीही बदल घडत नाही. यासाठी आपल्या सर्वांना हृदय व डोक्याने बदलण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन जेटली यांनी केले. समलैंगिक संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
> भारतातील राजकीय पक्षांनी या मुद्यावर आपापसातील सर्व मतभेद बाजूला सारून ‘लोकांसाठी, लोकांचे आणि लोकांकडून’ मंजूर झालेल्या विधेयकाप्रमाणे ते असावे, अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली.