जयपूर : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात रविवारी मालवाहू रेल्वेसाठी असलेल्या कॉरिडॉरमध्ये रुळांवर सिमेंटचे ब्लॉक टाकून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. यात कोणतीही हानी झाली नाही. याच दिवशी रात्री कानपूरनजीक कालिंदी एक्स्प्रेस मार्गावर सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न झाला होता.
रविवारी काही समाजकंटकांनी या कॉरिडॉरमध्ये रुळांवर सिमेंटचे ब्लॉक टाकले होते. अशा दोन ब्लॉकवर एक मालगाडी धडकली. फुलेरा- अहमदाबाद मार्गावर सरधना- बांगड स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कॉरिडॉर कंपनी डीएफसीसीचे उपमहाव्यवस्थापक (सुरक्षा) चित्रेश जोशी यांनी सांगितले, रविवारी रात्री रुळांवर टाकलेल्या सिमेंटच्या ब्लॉकना रेल्वे धडकली. सुरक्षा रक्षकाने ही माहिती नियंत्रण कक्षाला देताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी रुळांवर सिमेंटचे ब्लॉक सापडले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम कॉरिडॉरमध्ये घडलेली या प्रकारची ही पहिलीच घटना आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद- जोधपूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसलाही असाच घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता.
आधी कालिंदी एक्स्प्रेस, आता...
यापूर्वी कालिंदी एक्स्प्रेसच्या मार्गावरही असाच प्रकार घडला होता. कानपूरजवळ अनवर- कासगंज रेल्वेमार्गावर ८ सप्टेंबर रोजीच रुळांवर एक गॅस सिलिंडर ठेवले होते. यासोबत एक पेट्रोल भरलेली बाटली आणि काही स्फोटकेही सापडली होती. त्यापाठोपाठ ही दुसरी घटना समोर आली आहे.