मणिशंकर अय्यरांच्या मुलीच्या प्रसिद्ध थिंक टँकवर केंद्राची कारवाई; एफसीआरए लायसन रद्द केले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:25 PM2024-01-17T12:25:31+5:302024-01-17T12:25:56+5:30
या थिंक टँकने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.
केंद्राच्या गृह मंत्रालयानेकाँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या थिंक टँकवर मोठी कारवाई केली आहे. यामिनी अय्यर यांच्या नेतृत्वाखालील प्रसिद्ध थिंक टँकचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) रद्द केला आहे.
यामिनी यांच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) असे या थिंक टँकचे नाव आहे. ही संस्था नियमांचे उल्लंघन करत होती, या कारणामुळे तिचे एफसीआरए रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चवर यापूर्वीही आयकर विभागाची नजर पडली होती. आयकर सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये गृह मंत्रालयाने सीपीआरचा एफसीआरए परवाना निलंबित केला होता. आता MHA च्या FCRA विभागाने त्याचा परवाना रद्द केला आहे.
यामिनी यांच्या थिंक टँकला फोर्ड फाऊंडेशनसह अनेक परदेशी संस्थांकडून निधी प्राप्त झाला होता. या थिंक टँकने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. 2016 मध्येच सेटलवाड यांच्या एनजीओ सबरंग ट्रस्टचा एफसीआरए परवाना निलंबित केला होता. आता सीपीआरवर कारवाई करण्यात आली आहे.
ही संस्था नेमके काय करते?
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च भारताच्या 21 व्या शतकातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल संशोधन करते. संस्थेच्या वेबसाइटनुसार, भारतातील विचारवंत आणि धोरणकर्ते या संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र येतात आणि धोरणात्मक मुद्द्यांवर निर्णय घेतात. भारताची इको सिस्टीम विकसित करणे हा या बैठकांचा उद्देश असल्याचा संस्थेचा दावा आहे.