नवी दिल्ली : मुंबईतील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी नरिमन पॉइंट ते पश्चिम उपनगरांतील मालाड-कांदिवली या ३६ किमीच्या सागरी रस्ते प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत. सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या या नियोजित प्रकल्पासाठी राज्य सरकारने सल्लागाराचीही नेमणूक केली आहे. या प्रस्तावित मार्गावर इमारत बांधकामांना मज्जाव करण्यासाठी कायदा आणण्याचा राज्याचा विचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यातील बैठकीनंतर फडणवीस यांनी येथे ही माहिती दिली. या बैठकीत सागरी मार्गातील पर्यावरणविषयक अडथळे तसेच सीआरझेडमधील नियमांत सुधारणा याची सविस्तर चर्चा करण्यात आली. जावडेकर म्हणाले, की मुंबईतील सागरी रस्ते प्रकल्पावर केंद्र शासन सकारात्मक आहे. यासाठी नियमात सुधारणा करण्याचा केंद्र शासन विचार करेल. बैठकीला खा. पूनम महाजन मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
सागरी मार्गासाठी केंद्र सरकार अनुकूल!
By admin | Published: January 11, 2015 1:32 AM