राहुल गांधींना बजावलेल्या नोटिसीचा तपशील उघड करण्यास केंद्राचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:03 AM2019-06-05T03:03:18+5:302019-06-05T06:14:31+5:30
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल भाजपचे खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल यांना एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्यांना बजावलेल्या नोटिसीतील माहिती उघड करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला आहे. तपासात अडथळे निर्माण होऊ शकेल अशी माहिती उघड करण्यास माहिती अधिकार कायद्यामध्ये प्रतिबंध करण्यात आला आहे असे कारण त्यासाठी गृहमंत्रालयाने पुढे केले आहे.
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल भाजपचे खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल यांना एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली. या नोटिसीत नेमके काय म्हटले आहे याबद्दलचा तपशील माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे या मंत्रालयाकडे मागविण्यात आला होता. लंडन येथील बॅकॉप्स लिमिटेड या कंपनीचे राहुल गांधी संचालक आहेत. या कंपनीने १० ऑक्टोबर २००५ व ३१ ऑक्टोबर २००६ रोजी वार्षिक उत्पन्न अहवाल सादर केला. त्यात राहुल गांधी इंग्लंडचे नागरिक असल्याचेही नमूद केल्याचा हवाला देत डॉ. स्वामी यांनी चौकशीची मागणी केली होती.
हास्यास्पद प्रकार : प्रियांका गांधी
डॉ. स्वामी यांच्या तक्रारीबाबत राहुल गांधी यांनी आपले म्हणणे सादर करावे, अशी नोटीस त्यांना गृहमंत्रालयाने बजावली होती. प्रियांका गांधी यांनी म्हटले होते की, राहुल यांचा जन्म व ते लहानाचे मोठे भारतातच झाले ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. तरीही त्यांना नोटीस पाठवणे हास्यास्पद आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१५मध्ये फेटाळली होती.