नवी दिल्ली - केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून 'इज्जत घर' ठेवलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याने कौतुक केलं होतं. यानंतर 16 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून शौचालयांना 'इज्जत घर' म्हणून संबोधलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. अनेक भाषांचा वापर होत असणारी राज्ये 'इज्जत घर'शी समांतर दुसरं नाव ठेवू शकतात, असंही पत्रातून सुचवण्यात आलं आहे.
ही सूचना अशावेळी आली आहे जेव्हा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाकडून उत्तर प्रदेशात शौचालयांचं नाव 'इज्जत घर' ठेवलं जात आहे. दुसरीकडे केंद्राने पत्रात लिहिलं आहे की, शौचालय एका कुटुंबात प्रतिष्ठा आणि अभिमान निर्माण करतो त्यामुळे असं करणं चांगलं आहे. त्यामुळे देशामधील अन्य ठिकाणीही शौचालयाचं नाव 'इज्जत घर'च्या पार्श्वभुमीवर ठेवलं जाऊ शकतं.
वाराणसी दौ-यावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा एका शौचालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींनी यावेळी असेही म्हटले होते की, शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला हे फार आवडले. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील.
स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजनही केलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी काहीकाळ श्रमदानही केलं. वाराणसी दौ-यातील शेवटच्या दिवशी शहंशाहपूर गावात स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी स्वत: शौचालयासाठी विटा रचल्या. पशुधन आणि आरोग्य मेळाव्याचं उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहंशाहपूरमध्ये आले होते. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.