नवी दिल्ली : आसामात सर्वानंद सोनोवाल आणि गोव्यात मनोहर पर्रीकर या दोन केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांतही मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री व खासदारांची नावे पुढे आली असून, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतरच हे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्री करण्याची चर्चा दिल्लीत सुरू होती. पण उत्तम काम करणाऱ्या आणि राज्यावर पकड बसवलेल्या फडणवीस यांना महाराष्ट्रातून हलवू नये, असे अखेर ठरल्याचे समजते.सर्वानंद सोनोवाल यांच्यानंतर गोव्यात पर्रीकर यांना पाठवण्याची वेळ भाजपावर आली आणि आता पुन्हा दोन मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री व खासदार यांचीच नावे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सर्वांत पुढे असून, त्यांच्या नावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रा. स्व. संघाच्या नेत्यांशी अमित शाह चर्चा करतील आणि राजनाथ सिंह यांचे नाव जाहीर केले जाईल, अशी चर्चा लखनऊमध्येही सुरू आहे. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांचे नाव आघाडीवर आहे. पर्रीकर यांच्यानंतर राजनाथ सिंह वा मनोज सिन्हा यांना राज्यात पाठवल्यास केंद्रात बदल करणे अपरिहार्य आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळात सतत बदल होणे योग्य नाही, असे संघ नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी एखाद्या वेगळ्याच नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी नक्की करतील, असे कळते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मीदेखील फक्त ऐकतोय‘तुम्ही ऐकताय तसेच मीही ती अटकळ ऐकतोय, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीला जाणार असल्याची अफवा फेटाळून लावली. संरक्षण मंत्रीपदाचा मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रात फेरबदल होणार असून, त्यात फडणवीस यांना बोलावले जाईल आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी अफवा दोन दिवसांपासून जोरात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी विकासाचे अनेक निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वात सरकारची घडी नीट बसत असताना त्यांना दिल्लीला हलविले जाण्याची शक्यता नाही. यूपीत कोण जाणार? : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून जाण्यात खा. योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष खासदार केशव प्रसाद मौर्य यांनाही रस आहे. पण पक्षाच्या ३१२ आमदारांना डावलून मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री वा खासदाराला पाठवावे का, हा सवाल भाजपापुढे आहे.उत्तराखंडातही पेचउत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून भगतसिंग कौशियारी, बी. सी. खंडुरी, रमेश पोखरियाल निशंक व सत्पाल महाराज यांची नावे घेतली जात आहेत. हे सारे खासदार आहेत. खासदार वा केंद्रीय मंत्र्यांना राज्यात पाठविल्यास लोकसभा व विधानसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागेल. ती टाळण्याची अनेकांची इच्छा आहे. यांची नावे चर्चेतदोन्ही राज्यांत एखाद्या आमदारालाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी पक्षात होत आहे. यूपीत सतीश महाना व सुरेश खत्री या जुन्या नेत्यांचा तर उत्तराखंडमध्ये देवेंद्रसिंग रावत व प्रकाश पंत या आमदारांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार सुरू असल्याचे कळते. अखेर मौर्यच? : भाजपा नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत केशव प्रसाद मौर्य हेच नाव योग्य ठरेल, अशी चर्चा झाली. मौर्य ओबीसी समाजाचे असून, संघ नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. ते संघाचे जुने कार्यकर्ते आहेत.
केंद्रामध्ये फेरबदल?
By admin | Published: March 15, 2017 4:40 AM