ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - अर्थसंकल्पीय अधिवेशन निर्विघ्न पार पडावे यासाठी मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करत अधिवेशनात विरोधी पक्षांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून देशभरातील जनतेला मोठ्या अपेक्षा असतात. हे अधिवेशन सुरळीत पार पडावे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच पक्षांकडून सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त केली.
सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संसदेच्या गेल्या अधिवेशनात विरोधकांनी राज्यसभेत सरकारची चांगलीच कोंडी केली. लोकसभेत भाजपाला बहुमत असले तरी राज्यसभेत भाजपाकडे बहुमत नाही. गेल्या अधिवेशनात मोदी सरकारचे अनेक महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेत मंजूर झाले पण राज्यसभेत विरोधकांनी अडवून धरले. अखेर अध्यादेश जारी करत मोदी सरकारने या समस्येवर तात्पुरता तोडगा काढला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेसोबतच राज्यसभेतही विरोधकांचे सहकार्य मिळावे यासाठी मोदी सरकारने जोरदार तयारी सुरु केली आहे. रविवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये मोदींनी सर्व पक्षीय नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करुन देत सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी एकत्र येऊन काम करुया असे आवाहन केले. तर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. नायडूंनी भूमी अधिग्रहण विधेयकासह अनेक महत्त्वाचे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती सोनिया गांधी यांना केली. या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे नायडूंनी सांगितले.