Farmers Protest ( Marathi News ) :शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले शेतकरी दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहीत केंद्राच्या या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. "राज्य सरकार हे शंभू आणि धाबी-गुर्जन सीमेवर शेतकऱ्यांना जमण्यास सहकार्य करत आहे, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. हे आंदोलन दिल्लीत करावं, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. मात्र हालचालींवर निर्बंध असल्याने ते पंजाब आणि हरियाणा सीमेवर थांबले आहेत," असं पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.
पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी पुढे म्हटलं आहे की, "हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आतापर्यंत १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतरही पंजाब सरकारने अत्यंत जबाबदारीने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणं गरजेचं आहे."
शेतकरी नेत्यांचा सरकारला इशारा
"शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये," असं शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी म्हटलं आहे.