- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार लवकरात लवकर नियंत्रणात आणला पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून रोजी अमेरिका व इजिप्तच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आणि सरकारला कळवला असल्याचे समजते. मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक घरांचे नुकसान झाले आहे व ५० हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. भाजपसह कुकी आमदारांनी या हिंसाचारात राज्य पोलिस दोषी असल्याचा आरोप केला आहे. या भागात वर्चस्व असलेल्या मैतेईंचे म्हणणे आहे की, आसाम रायफल्स कुकी बंडखोरांना मदत करीत आहेत. मोदी सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, नऊ वर्षांत पंतप्रधानांनी कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही.
प. बंगालमधील हिंसाचारानंतर सरकार बरखास्त करण्याचा दबाव होता. परंतु सरकारने सरकार बरखास्त करण्यासाठी कलम ३५६चा वापर केला नाही. मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्यास मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह असमर्थ ठरत असल्यामुळे त्यांना कायम ठेवण्याबाबत भाजप द्विधा मन:स्थितीत आहे.
मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे : राहुल गांधीपंतप्रधान मोदी देशात नसताना मणिपूर मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. यावरून त्यांच्यासाठी (मोदी) मणिपूरचा मुद्दा महत्वाचा नाही हे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.