ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - केंद्र सरकारने स्वतःच्या प्रमुख योजनांची अमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. मोदी सरकारनं 10 दिवसांमध्ये जवळपास 8 लाख भारतीय नागरिकांना फोन करून या योजनांची व्यवस्थितरीत्या अमलबजावणी होते आहे की नाही याची माहिती घेतली आहे. त्या नागरिकांना काही प्रश्नही विचारण्यात आले आणि सुधारणा करण्यासाठी त्यांचा सल्लाही घेण्यात आला आहे.
10 दिवसांमध्ये जवळपास 8 लाख लोकांना फोन करणं हे फार मोठं आव्हान होतं. यासाठी बीएसएनएलच्या जवळपास 800 एजंट्सची मदत घेण्यात आली होती. 'प्रधानमंत्री जन धन योजना',' स्वच्छ भारत', 'स्वच्छ विद्यालय' आणि 'सॉईल हेल्थकार्ड' या चार महत्त्वाकांक्षी योजना कोणत्या जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबवण्यात आल्या याची माहिती घेण्याचे काम या एजंट्सना देण्यात आले होतं.
यातील ज्या जिल्ह्यांत या योजना चांगल्या प्रकारे योजना राबवल्या गेल्यात त्या जिल्ह्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या जिल्ह्यांना 21 एप्रिल रोजी 10 लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी जवळपास जिल्ह्यांना 10 लाखांचे 10 पुरस्कार देण्यात येणार आहेत.