झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. याच दरम्यान, आयकर विभागाने राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे पर्सनल सेक्रेटरी सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापा टाकला आहे. या कारवाईत अधिकारी निवासस्थानाची झडती घेत आहेत. रांची आणि जमशेदपूरसह एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहेत.
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी रांचीमध्ये आयकर विभागाचीची ही मोठी कारवाई मानली जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. पथक अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर आला आहे. सुनील श्रीवास्तव यांच्या घरामध्ये जाताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेमंत सोरेन यांचे पर्सनल सेक्रेटरी हे रांची येथील अशोक नगरमध्ये राहतात.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. हिंमत असेल तर समोरून लढा, भ्याड इंग्रजांसारखे मागून हल्ले का करता, असं म्हणत हल्लाबोल केला होता. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत "कधी ईडी, कधी सीबीआय, कधी एजन्सी, कधी कोणीतरी दुसरंच....आता माझी इमेज डागाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. विचित्र परिस्थिती आहे. भाजपाचे सरकार ११ वर्षे केंद्रात सत्तेवर आहे, ५ वर्षे राज्यात राहिले आणि स्वतःला डबल इंजिनचे सरकार म्हणवून घेते. पाच वर्षांत १३ हजार शाळा का बंद झाल्या?" असं देखील म्हटलं आहे.
८१ सदस्यीय झारखंड विधानसभेसाठी १३ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. एकूण २.६ कोटी मतदार मतदानात सहभागी होण्यास पात्र आहेत. यामध्ये १.३१ कोटी पुरुष आणि १.२९ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच ११.८४ लाख पहिल्यांदा मतदार आणि ६६.८४ लाख युवा मतदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने ३० जागा जिंकल्या, भाजपाने २५ जागा जिंकल्या आणि काँग्रेसने १६ जागा जिंकल्या.