- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांचे वडील बलकौर सिंग आणि आई सरपंच चरण कौर यांनी चंडीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. सिद्धू यांचे वडील बलकौर यांना रडू फुटले. या हत्येचा तपास केंद्रीय एजन्सीकडून करावा, अशी त्यांनी अमित शहा यांना विनंती केली. दरम्यान, मुसेवाला यांच्या हत्येची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची सरकारची मागणी फेटाळण्यात आली आहे.
यावेळी बलकौर सिंग यांनी अमित शहा यांना सांगितले की, सहा दिवस झाले तरी अजूनही हल्लेखोरांना पकडण्यात आलेले नाही. हे हल्लेखोर राजस्थान आणि हरयाणातील असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्रीय एजन्सीकडून याचा तपास करावा.
न्यायाधीशांकडून चौकशीस नकार मुसेवाला यांच्या हत्येची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून करण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळण्यात आली आहे. न्यायालयाने सरकारला एक पत्र पाठविले आहे. न्यायाधीशांची बरीच पदे रिक्त असल्याने तपासासाठी एका न्यायाधीशांना देणे शक्य नाही, असे म्हटले आहे.