Ayodhya Ram Mandir: ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. या सोहळ्याचे जगभरात कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आला. सर्व मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.
देशाचे मनोबल आणि 'सांस्कृतिक आत्मविश्वास' वाढवून 'नव्या युगाची सुरुवात' केल्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 'लोकांचा नायक' म्हणून पंतप्रधान मोदी यांचे झालेले स्वागत, ही एक अभूतपूर्व विकासाची सुरुवात असल्याची भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, पंतप्रधान महोदय, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे भारतीय सभ्यतेचे ५०० वर्षे जुने स्वप्न पूर्ण करण्याचे प्रतीक आहे. १९४७ मध्ये देशाला शरीररुपाने स्वातंत्र्य मिळाले, पण राम मंदिरामुळे आत्मा मिळाला आहे.
या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली
अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा अधिक भावनिक होता. आणीबाणीला विरोध करण्यासाठी लोकांनी दाखविलेल्या एकजुटीचाप्रमाणे या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली. प्रभू श्रीरामाची लोकप्रियता ही एका नव्या युगाची नांदी आहे. लोकांनी शतकानुशतके वाट पाहिली. याचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे, जी एक राष्ट्रीय कथा बनली. राम मंदिर आंदोलन हा स्वातंत्र्यानंतरचा एकमेव असा टप्पा आहे, ज्याने भारतीयांना एकत्र केले. त्याच वेळी, उत्सवाचे वातावरण, रस्त्यावरील भावनांचे प्रतिबिंब राम मंदिर आंदोलनाचे पूर्णत्व दर्शवते.
राम मंदिरामुळे देशाला आत्मा मिळाला
केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. परंतु २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते अद्वितीय आहे. कारण ते शतकांच्या प्रतीक्षेनंतर ते मिळाले आहे. खरे तर आपण असे म्हणू शकतो की देशाला शरीररुपाने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण आता त्याचा आत्मा सापडला आहे. आपल्या सर्वांसाठी ते आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक आहे. अयोध्येतील पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देताना, जिथे त्यांनी राम हे भारताचे सार म्हणून वर्णन केले होते, त्या ठरावात म्हटले आहे की, नियतीने भारताच्या शाश्वत सनातन संस्कृतीचा पाया आणि त्याच्या जागतिक प्रभावाचा पाया असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली.