नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकपाल कायद्यानुसार गेल्या दोन वर्षांतील संपत्ती १५ एप्रिलपर्यंत घोषित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना स्वत:सह (पती/ पत्नी) वारसदारांची संपत्तीही जाहीर करावी लागेल.कर्मचाऱ्यांना विविध सेवा नियमांनुसार संपत्ती जाहीर करावी लागत असून त्या व्यतिरिक्त लोकपाल कायद्यानुसारही मालमत्ता घोषित करावी लागणार आहे. विदेशी बँकांतील गुंतवणूक, महागडी पेंटिंग्ज, प्राचीन मूल्यवान वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चल मालमत्ता, विमा, रोखे, शेअर्स, म्युच्युअल फंडस् आदींचा त्यात समावेश असेल. आपापल्या विभागातील कर्मचाऱ्यांनी संपत्ती जाहीर करावी याची खातरजमा करण्याबाबत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सर्व केंद्रीय मंत्रालये आणि सचिवांना पत्रे पाठविली आहेत. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी २०१४ आणि २०१५ या वर्षासाठी आयकर विवरण सादर करावे असे डीओपीटीने स्पष्ट केले. २०१६ या वर्षासाठी स्वतंत्र आयकर विवरण ३१ जुलैपर्यंत भरावे लागेल. (वृत्तसंस्था)केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ५० लाखांच्या घरात असून २ लाखांपेक्षा जास्त असलेली गुंतवणूक वैयक्तिक पातळीवर नोंदवावी लागेल. त्यापेक्षा कमी असलेली गुंतवणूक एकत्रितरीत्या दाखवता येईल. विदेशी बँकांमधील गुंतवणुकीबाबत स्वतंत्र माहिती द्यावी लागणार आहे.हातात असलेली रोख रक्कम, बँकेतील गुंतवणूक, रोखे, कर्ज रोखे, शेअर्स, कंपनीतील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी, भविष्यनिर्वाह निधी, वैयक्तिक कर्ज, कुणाला दिलेली आगाऊ रक्कम अशा प्रकारच्या माहितीचा त्यात समावेश असेल. महागडे फर्निचर, प्राचीन मूल्यवान वस्तूंची सध्याची एक लाखापेक्षा जास्त किंवा दोन मूळ वेतनापेक्षा जास्त किंमत असेल तर तसे नमूद करावे लागेल. आयकर विवरण भरण्याच्या अंतिम तारखेबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे डीओपीटीने यापूर्वीच जाहीर केले आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, संपत्ती घोषित करा
By admin | Published: April 05, 2016 12:18 AM