संतोष ठाकूर नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) जानेवारी २०२० पासून चार टक्के वाढवून दिला आहे. या वाढीमुळे भत्ता १७ वरून २१ टक्क्यांवर गेला. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, या निर्णयामुळे देशात जवळपास १.१३ कोटी कुटुंबांना लाभ होईल. जवळपास ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारक याचे लाभार्थी आहेत. वाढीव भत्त्याची तीन महिन्यांची थकबाकी दिली जाईल.
एका सरकारी अधिकाºयाने सांगितले की, ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या धोरणानुसार केली गेली आहे. केंद्रीय कर्मचाºयांना हा भत्ता महागाईचा दर पाहून दिला जातो. याचा उद्देश असा आहे की, महागाईच्या दिवसांत कर्मचाºयांच्या हातात काही अतिरिक्त पैसा असावा.सरकारने जाहीर केलेला महागाई भत्ता हा समयोचित असल्याचे सांगून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, अर्थव्यवस्था खालच्या पायरीवर असताना या भत्त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल.