नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या अराजपत्रित (नॉन गॅझेटेड) कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिवाळीत ७ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत लाभ होईल. सूत्रांनी सांगितले की, उत्पादकतेशी निगडित बोनस आणि बिगर-उत्पादकता निगडित बोनस अशा दोन प्रकारांत हा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. रेल्वे आणि टपाल विभागाचे कर्मचारी वगळता इतर विभागाच्या सर्व ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या वेतनाएवढा बिगर-उत्पादकता बंधित बोनस दिला जाईल. यालाच तदर्थ बोनस म्हटले जाते. यात जास्तीत जास्त सात हजार रुपये कर्मचाऱ्यास मिळतील. असाच बोनस केंद्रीय निमलष्करी दले आणि सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांनाही मिळेल. २०२०-२१ मध्ये किमान सहा महिने सेवा करणारे कर्मचारी तदर्थ बोनससाठी पात्र ठरतील. तीन वर्षांपासून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांनाही तदर्थ बोनस मिळेल. वर्षात किमान २४० दिवस काम करणारे हंगामी कर्मचारी बोनससाठी पात्र असतील.रेल्वे, पोस्ट कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभरेल्वे आणि डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना उत्पादकता बंधित बोनस दिला जाईल. रेल्वेच्या ११.५६ लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना सर्वाधिक ७८ दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळेल. प्रत्येक कर्मचाऱ्यास जवळपास १७,९५० रुपये बोनसपोटी मिळतील. डाक विभागाच्या पात्र कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनाएवढा बोनस दिला जाईल. डाक विभागाने १२० दिवसांचा बोनस देण्याची शिफारस केली होती. तथापि, वित्त मंत्रालयाने ती अस्वीकृत करून ६० दिवसांचा बोनस मंजूर केला. ग्रामीड डाक सेवक, हंगामी कामगार, ग्रुप बीचे नॉन गॅझेटेड अधिकारी, एमटीएस आणि ग्रुप सीचे कर्मचारी बोनससाठी पात्र असतील.
दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस; ७ ते १८ हजार रुपये मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:31 AM