रामनवमीच्या मुहूर्तावर देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. प. बंगालपासून ते बिहार, झारखंडपर्यंत तणाव निर्माण झाला होता. आता हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे.
उच्चन्यायालयाने फटकार लगावल्यानंतर बंगालमध्ये अलर्ट -रामनवमी प्रमाणे स्थिती आता निर्माण होऊ नये म्हणून, राज्यांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये अजूनही हिंसाचार सुरू असल्याने तेथील प्रशासन हनुमान जयंतीनिमित्त अधिक सतर्क झाले आहे. कोलकाता उच्च न्यायालयालाही येथे हस्तक्षेप करावा लागला आहे. हनुमान जयंती संदर्भात काय व्यवस्था आहेत? असा प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला विचारला आहे. तसेच, जर बंगाल पोलिस परिस्थिती हाताळण्यास सक्षम नसतील, तर निमलष्करी दलाची मदत घ्यावी, याच बरोबर जेथे कलम 144 लागू आहे, तेथे कोणतीही शोभायात्रा अथवा मिरवणूक काढू नये, असे निर्देशही कोलकाता उच्च न्यायालयानेही ममता सरकारला दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हनुमान जयंतीनिमित्त बंगालमध्ये शांतता बाळगावी, असे आवाहन जनतेला केले आहे. हा उत्सव आनंदाने साजरा करा. बंगाल ही शांतता प्रीय भूमी आहे. खरे तर, रामनवमीच्या हिंसाचारानंतर, हनुमानांबद्दल सर्वांना आदर आहे, परंतु हिंसाचार कुठल्याही परिस्थितीत हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. पुन्हा एकदा काही वाईट तत्व हिंसाचार पसरवण्याचे काम करू शकतात, असे सीएम ममता म्हणाल्या होत्या.
ममतांच्या याच वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. ममतांच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने हल्ले होत असल्याचेही भाजप सातत्याने म्हणत आहे. यातच आता बंगालमध्ये हनुमान जन्मोत्सवाप्रसंगीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी केंद्रीय दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
दिल्लीत पोलीस तैनात, जहांगीरपुरीतून निघणार शोभायात्रा -जहांगीरपुरी येथे गेल्यावर्षी प्रमाणे पुन्हा उपद्रव होऊ नये यासाठी, येथे सुरक्षा दलाचा मार्च निघत आहे. महत्वाचे म्हणजे, विश्व हिंदू परिषदेने जहांगीरपुरीतून मिरवणूक काढण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी पोलिसांनी यासाठी परवानगी दिली नव्हती, मात्र आता याला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अर्थात आता ही मिरवणूक पोलीस बंदोबस्तात निघेल.
केंद्र सरकारची अॅडव्हायजरी? -यातच केंद्र सरकारनेही यासंदर्भात अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, राज्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कायदा आणि सुरक्षा व्यवस्थित करावी. तसेच, समाजातील शांतता-सद्भाव बिघडविणाऱ्या कुठल्याही घटनेकडे दूर्लक्ष करू नये, असे म्हणण्यात आले आहे. यासंदर्भात, गृह मंत्रालयाने ट्विट केले आहे, "गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासंदर्भात, उत्सवाचे शांततेने पालन करणे आणि समाजात सांप्रदायिक सलोखा बिघडवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे."