अमरावती : आंध्र प्रदेशाला केंद्राकडून कमी निधी मिळत असल्याने गेले काही दिवस तेलगू देसम व भाजपामध्ये चांगलीच धुसफूस सुरू असतानाच केंद्राने या आंध्रातील विविध विभागांसाठी १२६९ कोटींचा निधी दिला आहे. टीडीपी व भाजपामधील संबंधांमध्ये वादाचा विषय ठरलेल्या पोलावरम प्रकल्पासाठी यात ४१७.४४ कोटी देण्यात आले आहेत.केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाचे वरिष्ठ संयुक्त आयुक्त आर.पी.एस. शर्मा यांनी सांगितले, की आंध्र प्रदेश सरकारने पोलावरम प्रकल्पावर १ एप्रिल २०१४ नंतर काही निधी खर्च केला आहे. या कामासाठी ४१४.४४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. पोलावरम प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्राने आंध्र सरकारला ४३२९ कोटी रुपयांचा निधी याआधीच दिला आहे. परंतु, आंध्र प्रदेश सरकारचे असे म्हणणे आहे, की राज्याने यावर ७,२०० कोटी रुपये खर्च केले आहेत.आंध्र प्रदेशाचे अर्थमंत्री यनमला रामकृष्णुडू यांनी मागच्या महिन्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देऊन, पोलावरमवर खर्च केलेल्या ३२१७ कोटी रुपयांच्या निधीचा परतावा केंद्राकडून मिळणे बाकी आहे, असे नमूद केले होते.वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार शुक्रवारी केंद्राकडून राज्यांना हस्तांतरित केल्या जाणाºया अधिकारापोटी महसुली तूट अनुदान म्हणून ३६९ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाची योग्य नोंद ठेवण्याच्या सूचना केंद्राने राज्याला केली आहे.अंगणवाड्या, पोषक आहारासाठी निधीकेंद्र सरकारने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मूलभूत अनुदानापोटी २५३ कोटींचा निधी वर्ग केला आहे. हा या आर्थिक वर्षातील दुसरा हप्ता आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या अंगणवाडी, पोषक आहार योजनेसाठी १९६ कोटी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमासाठी आणखी ३१ कोटी रुपये दिले आहेत.
आंध्र प्रदेशाला केंद्राकडून १२६९ कोटींचा निधी, नायडूंना चुचकारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:31 AM