नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेली प्रदूषणाची स्थिती कायम आहे. त्यावर उपाय करण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने इंफोर्समेंट टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने पाच सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली, ज्याला कायदेमंडळाचे अधिकारही देण्यात आले आहेत. यासोबतच 17 फ्लाइंग स्क्वॉड्सही बनवण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल
एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन ही माहिती दिली. प्रतिज्ञापत्रानुसार, सर्वोच्च न्यायालयाने 2 डिसेंबर रोजी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आयोग आणि केंद्राने पाच सदस्यीय इंफोर्समेंट टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
टास्क फोर्सला शिक्षा करण्याचा अधिकार
या टास्क फोर्सला शिक्षा आणि प्रदूषणाचा प्रसार रोखण्यासाठी विधायी अधिकार देण्यात आले आहेत. एमएम कुट्टी(CAQM चे अध्यक्ष) आणि CPCB चे अध्यक्ष तन्मय कुमार हे या टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य असतील. याशिवाय, TERI चे DG डॉ. विभा धवन, मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष NK शुक्ला आणि CAQM NGO सदस्य आशिष धवन हे देखील टास्क फोर्सचे सदस्य आहेत.
दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती
दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) आज सकाळी 385 वर राहिला, तर नोएडामध्ये 562 आणि गुरुग्राम 413 एक्यूआय नोंदवला गेला. त्याच वेळी, गाझियाबादमध्ये पीएम 2.5 ची पातळी 222 नोंदवण्यात आली. यापूर्वी गुरुवारी (2 डिसेंबर) दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 342 होता.