नवी दिल्ली - भारत सरकारने ५४ अजून चिनी स्मार्टफोन अॅप्सवर निर्बंध घातल्याचे वृत्त आहे. मात्र निर्बंध घातलेल्या अॅप्सची कुठलीही अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पण ईटी नाऊने दिलेल्या एका वृत्तानुसार सरकारशी संबंधित सूत्रांनी ही माहती दिली आहे. यापूर्वी २०२० मध्ये केंद्र सरकारने एकूण २७० चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर २०२२ मध्ये सरकारकडून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच गरेना फ्री फायर नावाचा एक प्रसिद्ध स्मार्टफोन गेम आधीच गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरमधून गायब झाला होता. त्यामुळे असे वाटते की, या गेमचा प्रतिबंधित अॅपच्या लिस्टमध्ये समावेश असू शकतो. दरम्यान, अद्याप तरी अॅपल किंवा गुगलकडून याबाबत अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.बंदी घालण्यात आलेल्या अॅपच्या पूर्ण यादीबाबत अद्याप खूप कमी अधिकृत माहिती समोर आलेली आहे. मात्र समोर येत असलेल्या वृत्तानुसार निर्बंध घातलेल्या अॅपच्या नव्या यादीमध्ये २०२० मध्ये बंदी घातलेल्या बहुतांश अॅपच्या क्लोन अॅपचा समावेश आहे. त्यामुळे ५४ अजून अॅपवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारत सरकारकडून निर्बंध घालण्यात आलेल्या अॅप्सची एकूण संख्या ३२० वर पोहोचली आहे.
दरम्यान, भारत सरकारने याआधी टिकटॉक आणि पब्जी मोबाईल सह अनेक प्रसिद्ध अॅप्सवर निर्बंध घातले होते. त्यानंतर पब्जीने भारतामध्ये पुनरागमन करण्यात कसेबसे यश मिळवले. मात्र टिकटॉकवर देशात अद्याप बंदीच आहे.