नवी दिल्ली-
केंद्र सरकारनं आज यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया व्यासपीठावरील ३५ अकाऊंट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी याबाबतची माहिती दिली. २० जानेवारी रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ३५ यूट्यूब चॅनल, २ ट्विटर अकाऊंट, २ इन्स्टाग्राम, २ वेबसाइट आणि एक फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व अकाऊंट्सवर देशाविरोधातील माहिती अपलोड केली जात होती अशी माहिती समोर येत आहे.
ब्लॉक करण्यात आलेल्या सर्व अकाऊंट्स आणि चॅनलबाबतीत एक साम्य म्हणजे सर्व चॅनल्स पाकिस्तानातून ऑपरेट केली जात होती. मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं की ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनलचे १.२० कोटी सबस्क्राइबर्स आणि १३० कोटी व्ह्यूज होते. आता या चॅनल्सला ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता पुढच्या काळात आणखी काही चॅनल्स देखील ब्लॉक केले जातील. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत.
अनुराग ठाकूर यांनी दिला इशाराकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत देखील अशा देशविरोधी माहिती प्रसारित करणाऱ्या यूट्यूब व सोशल मीडिया अकाऊंट्सना इशारा दिला होता. राष्ट्राविरोधात माहिती अपलोड करणाऱ्या या अकाऊंट्सवर कारवाईचा आदेश मी दिला होता. जगभरातील अनेक देशांना त्यास पाठिंबा दिला याचा मला आनंद आहे. यूट्यूबनं देखील पुढाकार घेत आम्हाला मदत केली व ब्लॉक करण्याची कारवाई सुरू केली, असं अनुराग ठाकूर म्हणाले.