Flight Bomb Threats : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या येत असताना, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब असल्याच्या अनेक फसव्या धमक्या या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन पसरवल्या जात होत्या. त्यानंतर संतापलेल्या केंद्र सरकारने एक्सच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. बॉम्बच्या धमक्यांमुळे विमान सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून कोट्यवधींचे नुकसान झालं आहे.
गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक विमानांवर बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या धमक्यांमुळे विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने या विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या अधिकाऱ्यांना (पूर्वीचे ट्विटर) फटकारले आहे. तसेच अशा अफवांना सामोरे जाण्यासाठी ठोस कारवाई कारवाई का केली नाही असा सवाल देखील केला आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी बुधवारी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आणि एक्स, मेटा सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठक केली. या अध्यक्षस्थाथी असलेल्या भोंडवे यांनी एक्सवर नाराजी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावर या प्रकारच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही भोंडवे म्हणाले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि हे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे कृत्य असल्याचे म्हटलं आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या देणाऱ्या खात्यांच्या युजर्सचा आयडी किंवा डोमेनचे तपशील मिळविण्यात दिल्ली पोलिस अयशस्वी झाल्यानंतर केंद्राने सोशल मिडिया कंपन्यांवर रोष व्यक्त केला. विमान कंपन्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मंगळवारी देखील इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या ३० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की या कालावधीत त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क करून सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले. मात्र, आतापर्यंतच्या सर्व धमक्या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र यामुळे हजारो प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागले आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रचंड हाल झाले.