नवी दिल्ली: केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. अननस खाल्यानंतर हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्या मुलासह तिचा मृत्यू झाला. सदर घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची दखल आता केंद्र सरकारने देखील घेतली आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर करणार असल्याचे सांगितले आहे. प्रकाश जावडेकर म्हणाले की, फटाके फोडणे अन् मारणे ही भारतीय संस्कृती नाही. या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून दोषींना पकडण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.
बचाव पथकाचा एक भाग असलेले वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी फेसबुकवर यासंबंधीत पोस्ट लिहिल्यानंतर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. मोहन कृष्णन यांनी लिहिले की,"अन्नाच्या शोधात ती गावापाशी आली. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा अनुभव येईल असे तिला वाटलेही नव्हते. गर्भवती असल्याने मनुष्य दया दाखवतील असे तिला वाटले. त्यामुळे तिनं त्या लोकांवर आंधळा विश्वास दाखवला आणि ते अननस खाल्ले. तिच्या डोक्यात फक्त पोटातील बाळाचा विचार होता. पण जे घडलं ते दुर्दैवी होतं."
'हत्तीणीने सर्वांवर विश्वास ठेवला. तिने अननस खाल्ल्यावर ती अस्वस्थ झाली आणि काही वेळाने ते (फटाके) पोटात फुटले आणि हत्तीण अस्वस्थ झाली. हत्तीणीला स्वत: साठी नव्हे, तर पोटातील बाळासाठीही त्रास झाला असावा. ती पुढच्या १८ ते २० महिन्यांत जन्म देणार होती.' असं मोहन कृष्णन यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले.