नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचं महत्त्वाचं पाऊल केंद्राकडून उचलण्यात आलंय. याबद्दलचे आदेश संबंधित राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य आणि प्रधान सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिवदेखील बैठकीला हजर होते. पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं यावेळी सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांनी पंतप्रधानांच्या सचिवांना सांगितलं. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.देशातल्या ७५ राज्यांमधील वाहतूक येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामध्ये आंतरराज्यीय वाहतुकीचाही समावेश आहे. अत्यावश्यक स्वरुपाच्या वाहतुकीला यामधून वगळण्यात आलंय. केंद्रानं लॉकडाऊनसाठी ७५ जिल्ह्यांची यादी तयार केलीय. या जिल्ह्यांच्या यादीत राज्य सरकारं गरजेनुसार आणखी राज्यांचा समावेश करू शकतात. काही राज्यांनी याआधीच लॉकडाऊन करण्याबद्दलचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये राजस्थान आणि पंजाबचा समावेश आहे. पंजाब आतापर्यंत कोरोनाचे २६ रुग्ण आढळले असून राजस्थानात हाच आकडा १३ वर आहे. या राज्यांनी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झालीय. याआधी केंद्रानं रेल्वे वाहतूक बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवादेखील बंद राहणार आहे.
Coronavirus: तब्बल ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन; कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 3:29 PM